वैकल्पिक इतिहास : व्यूहरचना – भूषण देशमुख
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या मुख्य परीक्षेत एकच वैकल्पिक विषय घ्यायचा आहे. स्वयंवर असावे तशी निवड करायची आहे. विषय ठरवायचे वेगवेगळे निकष आहेत. त्यावर इतिहास हा विषय कुठे बसतो हे ठरवूया.
1)आवड
इतिहास विषय शाळेपासून असतो. इतिहास ही एक ‘कथा’आहे आणि कथा आवडायला वेगळे काही करावे लागत नाही. भारतासारख्या प्राचीन, वैविध्यपूर्ण देशाच्या इतिहासाचा अभ्यास करणे यासारखे सुख व भाग्य दुसरे नाही. थोडक्यात, विषय आवडायला काही अडचण नाही.
2) सामान्य अध्ययनात फायदा
इतिहास हा पूर्व परीक्षेत व मुख्य परीक्षेत सामान्य अध्ययनाचा नेहमीच महत्त्वाचा घटक राहिला आहे. वैकल्पिक विषयाचा अभ्यासक्रम सामान्य अध्ययनात पूर्ण क्षमतेने (पण कमी धडे) घेतला आहे. वैकल्पिक अभ्यासक्रमातील चारही भाग म्हणजे प्राचीन, मध्ययुगीन व आधुनिक भारत तसेच जगाचा इतिहास सामान्य अध्ययनात आले आहेत. त्याशिवाय भारतीय संस्कृती व वारसा यांना वाढते महत्त्व आयोग देतो आहे. पूर्वपरीक्षेत (२०२३ ) १०० पैकी १२ प्रश्न इतिहासावर आहेत. (प्राचीनवर २, मध्ययुग – १, आधुनिक – १ व संस्कृती – ८) थोडक्यात इतिहास हा वैकल्पिक विषय घेतलेल्या उमेदवारांचा सामान्य अध्ययनाचा अभ्यास करताना खूप वेळ वाचतो व गुण वाढू शकतात. जेव्हा एकेका गुणावर दहा रँक वरखाली होतात तेव्हा या मुद्द्याचे महत्व वेगळे सांगायला नको.
3) निबंध लिहिताना फायदा
दरवर्षी एकतरी सामाजिक- सांस्कृतिक स्वरूपाचा किंवा राजकीय विषय निबंधाच्या पेपरमध्ये असतो. उदा. २०२२ च्या मुख्य परीक्षेत निबंध आला होता, “इतिहास ही वैज्ञानिक व्यक्तिनी स्वप्नाळू व्यक्तींवर मिळवलेल्या विजयांची मालिका आहे” इतिहासाची पार्श्वभूमी दिली तर निबंध खुलवणे, त्याला खोली प्राप्त करून देणे सोपे जाते.
4) मुलाखतीत फायदा
मुलाखतीत विविध सामाजिक समस्यांवर प्रश्न विचारले जातात. ऐतिहासिक दृष्टीकोन विकसित झाला असेल, तर सत्याची वस्तुनिष्ठ मांडणी करणे सोपे जाते.
5) यशाचे सातत्य
या एका निकषावर इतिहास १००% उतरतो. इतर विषय गटांगळ्या खात असताना इतिहास गुणांच्या बाबतीत स्थिर राहिला आहे. दरवर्षी शेवटच्या यादीत इतिहास विषयाचे उमेदवार चमकतातच. विशेषतः हा विषय घेऊन बुडण्याइतके कमी गुण या विषयात येत नाहीत.
6) अभ्याससाहित्य
सर्व विषयांमध्ये सर्वात जास्त, सर्वात चांगले स्पर्धा परीक्षा अभ्याससाहित्य मराठी भाषेत इतिहासावर उपलब्ध आहे. या विषयाबद्दल काही समज-गैरसमज आढळतात. गैरसमज क्रमांक १ : इतिहासात भरपूर तथ्ये आहेत. समाधान : आपण शाळेत जसा इतिहास शिकतो, तसा आयोगाच्या अभ्यासक्रमात इतिहास नाही. हा विश्लेषणावर आधारलेला विषय आहे. यातील तथ्यांचे स्थान दुय्यम स्वरूपाचे आहे. विश्लेषणाचे इतके महत्व आहे की तथ्ये चुकली पण विश्लेषण योग्य असेल तरी गुण मिळतात.
गैरसमज क्रमांक २ : या विषयात पदवी असणे आवश्यक आहे. समाधान : हा विषय घेण्यासाठी या विषयाची पदवी घेतलेली पाहिजे असे नाही. कोणताही पदवीधर हा विषय घेऊन मेहनतीने त्यावर प्रभुत्त्व मिळवू शकतो.
गैरसमज क्रमांक ३ : इतिहास विषयात गुण पडत नाहीत समाधान : इतिहास हा UPSC परीक्षेतील सर्वात लोकप्रिय वैकल्पिक विषयांपैकी एक आहे. त्यातून सातत्याने टॉपर्स तयार होतात. २०२१ मध्ये श्रुती शर्माने इतिहास विषय घेऊन ऑल इंडिया रँक 1 साध्य केली. तिचे इतिहास विषयातील गुण ५०० पैकी ३०६ होते. २०२४च्या निकालात नौशीनने ऐच्छिक इतिहासात ३०८ गुणांसह अखिल भारतात ९ वा क्रमांक पटकावला.
गैरसमज क्रमांक ४ : मराठी माध्यमातून मुले पास होत नाहीत. समाधान : हा तर मोठा न्यूनगंड ठरु शकतो. प्रत्यक्षात विश्वास नांगरे-पाटील, अजित जोशी, श्रीकांत सुसे ते प्रतिक ठुबे पर्यंत अनेक उदाहरणे दाखवता येतील की ज्यांनी मराठी माध्यमातून व इतिहास हा वैकल्पिक विषय ठेवून देदीप्यमान यश मिळवले. मराठीत पुरेसे संदर्भ साहित्य उपलब्ध आहे.
तलवारीची धार :- आपल्याकडे आपण गमतीने म्हणतो की फक्त महाराष्ट्राला इतिहास आहे, बाकी प्रांतांना भूगोल. मराठी उमेदवारांना इतिहास विषयाची नैसर्गिक आवड व ओढ असते. त्यामुळे आश्चर्य नव्हे की इतिहास विषय घेऊन पद काढणाऱ्या माझ्या यशस्वी विद्यार्थ्यांची यादी मोठी आहे. उदा. श्रीकेश लाटकर, डॉ. नागनाथ गव्हाणे, कुणाल चव्हाण, सोनल सोनकवडे, गायत्री ह्यालिंगे, श्रद्धा पांडे, कौस्तुभ जोग, पवन बाधे, पूजा टिल्लू, क्षिप्रा आग्रे, तेजस्विनी सातपुते, मृण्मयी जोशी, प्रतीक ठुबे, प्राजक्ता ठाकूर, पुष्कराज पाटील, सायली ढोले, मोनिका पांडे, स्नेहल कार्ले, अभिषेक थरवळ, प्रशांत सुंबे, चेतन कळमकर, चिन्मया औरंगाबादकर, बालाजी मंजुळे, सज्जनसिंग चव्हाण, श्रीकांत सुसे, समीर वानखेडे, चिन्मय पंडीत, प्रसन्न दातार, प्रज्ञा खंदारे इत्यादी
अभ्यासाचे काही ठोकताळे :- इतिहासाकडे बघण्याचा दृष्टीकोन काळानुसार बदलत गेला आहे. सुरुवातीला राजकीय इतिहासाला महत्त्व होते, नंतर सांस्कृतिक व आता भूप्रस्तराखालील (subaltern) पद्धतीला महत्त्व आले आहे. उदा. २०२३ च्या मुख्य परिक्षेत प्रश्न होता, “इंग्रजांनी केलेला अनादर आणि भ्याड अपमानाने त्रस्त भारतीय जनतेची जागृत झालेली राजकीय जाणीव असहकाराच्या चळवळीला कारणीभूत ठरली.” (१०) इतिहासाच्या अभ्यासक्रमात सैद्धांतिक भाग नाही. प्राचीन, मध्ययुगीन व आधुनिक व जग चारही भाग उपयोजित आहेत. त्यामुळे अभ्यासाची दिशा एकदा ठरवली की तेच सूत्र ठेऊन सर्व अभ्यासक्रम पूर्ण करता येतो.
नकाशाचे प्रश्न नकाशावरील प्रश्न :- पहिलाच येतो, त्याला पर्याय नसतो. त्याचा अभ्यास आधी केलेला बरा. २० स्थळे नकाशावर दिलेली असतात. (प्रत्येक २.५ गुणांसाठी म्हणजे एकूण ५० गुणांसाठी) त्यांचे एका ओळीत वर्णनही केलेले असते (उदा. ऐतिहासिक लेणी). तेवढ्यावरून ते स्थळ ओळखायचे व त्याची विस्तृत माहिती लिहायची. (सुमारे ३० शब्दात) अभ्यासाच्या सोयीसाठी वैदिक स्थळे, महापाषाण स्थळे अशा याद्या करून ठेवणे सोयीचे. रोजच्या सरावाने या प्रश्नाला चांगले गुण मिळवता येतात. मुख्य परीक्षेत नकारात्मक गुण नाहीत. त्यामुळे गरज पडली तर अंदाज बांधून देखील लिहिता येते. प्रामुख्याने प्राचीन व काही मध्ययुगीन स्थळे विचारतात. नुकतीच उत्खनन झालेली ठिकाणे जास्त विचारतात.
कोणते पुस्तक धरू हाती :- प्राचीन भारताचा आवाका समजण्यासाठी डी. एन. झा यांचे मराठीतून ‘प्राचीन भारताची रुपरेखा’ हे पुस्तक उपयोगी पडू शकेल. त्याशिवाय गायधनी/ माहुरकर यांचे ‘प्राचीन भारताचा सांस्कृतिक इतिहास’ हे पुस्तक चांगले आहे. रोमिला थापर यांचे ‘अशोक आणि मौर्यांचा ऱ्हास’ हे पुस्तक मौर्य काळावर पकड मिळवून देते. मध्ययुगीन भारतावर सतीशचंद्र यांचे दोन खंड मराठीत प्रकाशित झाले आहेत ते उपयोगी पडतील. इतिहासाच्या चारही भागांपैकी जगाचा इतिहास सर्वात मर्यादीत आहे. जगाच्या इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी ‘मुख्य परिक्षेसाठी जगाचा इतिहास’ हे मराठीतून उपलब्ध असलेले जैन व माथुर यांचे पुस्तक उपयोगी पडेल. आधुनिक भारताचा अभ्यास करण्यासाठी सुमन वैद्य/ शांता कोठेकर यांचे ‘आधुनिक भारताचा इतिहास’ या विषयावर जे चार खंड आहेत ते वापरता येतील. ते पुढील काळवर्णन करतात. खंड एक – १७५७ ते १८५७, दोन – १८५७ ते १९२०, तीन – १९२० ते १९४७, चार – १९४७ ते १९८४.
NCERT ची जुन्या अभ्यासक्रमाची अकरावी – बारावीची पुस्तके आजही मुख्य परिक्षा देण्यासाठी उपयोगी पडतात. नवी NCERT (थिम्स) पण चांगली आहेत. त्यात सबाल्टर्न दृष्टीकोन चांगल्या प्रकारे आला आहे. दोन्ही करता आली तर उत्तम. त्यातून उत्तराची दिशा व संरचना याची माहिती होते. ही पुस्तके मराठीतही उपलब्ध आहेत. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या इतिहासावरील नोट्स देखील सोप्या भाषेत तरीही पुरेशा सखोल आहेत. ज्ञानरूपी वसा
मी तयार केलेल्या नोट्स हा एक ‘सौ दूखोकी एक दवा है’ सारखा जादुई दिवा आहे. मराठीत परिक्षाभिमुख (अभ्यासक्रम व मागील प्रश्न यांच्या चौकटीत) नोट्स तयार करण्याचे काम फक्त आपण केले आहे हे सांगायला अभिमान वाटतो. नोट्स UPSC पॅटर्ननुसार सानुकूलित केल्या आहेत. त्यात शोध आणि संशोधन यांच्यातील संतुलन आहे. त्यातून उमेदवारांना इतिहास विषयातील अंतर्दृष्टी प्राप्त होते.
लिहिण्याचे महत्व
उत्तरे लिहिण्याचा सराव करायला हवा, हे काही वेगळे सांगायला नको. एक उमेदवार तीन मुख्य परिक्षा देऊन झाल्यावर मला म्हणाला, ‘मला एक गोष्ट लक्षात आली आहे, सराव परिक्षा दिल्या पाहिजेत’. मी म्हटले लवकर समजले. अनेक उमेदवारांना असे वाटते की, अभ्यास संपताच आपण परीक्षा देऊ. पण हे स्वप्न क्वचितच प्रत्यक्षात येते. स्पर्धा परीक्षांचा अभ्यास काही संपत नसतो. त्यापेक्षा परीक्षांचे वेळापत्रक बनवा, त्याची कठोरपणे अंमलबजावणी करा, उत्तरे तपासून घ्या व चर्चा करून परिपूर्णता आणायचा प्रयत्न करा. मराठीतून उत्तरे लिहिताना वेग किंचित कमी होतो, त्यामुळे चाचण्यांचे महत्त्व अजूनच वाढते.
अक्षर, वाक्ये, शैली, गती व उत्तराची संरचना गुणप्राप्तीमध्ये महत्वाची भूमिका निभावतात. प्रश्नाचा रोख कुठल्या दिशेला आहे हे नीट जाणून घेऊन त्या दिशेला उत्तर नेले पाहिजे. उदा. चर्चा करा, विश्लेषण करा, वर्णन करा, तुलना करा, विस्तारुन सांगा, टीकात्मक परिक्षण करा या सर्वांचे अर्थ वेगवेगळे आहेत व त्यानुसार उत्तरात फरक पडतो. (याची सविस्तर चर्चा करणारा लेख माझ्या ब्लॉगवर ठेवला आहे. http://www.biasips.blogspot.com) जिथे जिथे शक्य आहे तिथे उत्तराला सारणी, आकृती यांची जोड दिली पाहिजे. उत्तरातील महत्वाचे मुद्दे अधोरेखित केले तर परीक्षकाचे काम सोपे होते.
तुम्हाला इतिहासावर फिल्म बघायला आवडेल का?
१) मोहेंजोदरो, आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित, एकदा पाहायला हरकत नाही
२) भारत एक खोज, जवाहरलाल नेहरू यांच्या पुस्तकावर आधारित
३) उत्सव, गिरीश कर्नाड यांची, गुप्त कालीन मृच्छकटीकवर आधारित
४) PS 1&2 साम्राज्यवादी चोळ यांचा उदय
५) पद्मावत, सुलतान व राजपूत यांच्यातील संघर्ष
६) द एंपायर, OTT सिरिज, बाबर व त्याचा काळ याबद्दल
७) जोधा अकबर, मुघलांच्या राजपूत धोरणाची सुरवात
८) बाजीराव मस्तानी, पेशवे काळ चांगला उभा केला आहे
९) जुनुन, १८५७ उठाव पार्श्वभूमीला घेऊन सादर केलेले कथानक
१०) खेले हम जी जान से, मास्टर सूर्यसेन व सहकारी यांचा पराक्रम
११) गांधी, रिचर्ड एटनबरो यांनी बनवलेला मास्टरपीस
१२) सरदार, ऐतिहासिक सिनेमा कसा असावा हे दाखवणारा
१३) नेताजी, सुभाषचंद्र बोस यांची कारकीर्द
१४) तमस, फाळणीचा अंधार गोविंद निहलानी यांची दाखवला आहे
१५) ट्रेन टू पाकिस्तान – खुशवंत सिंग यांच्या कादंबरीवर आधारित कथानक
